मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशात 24 मार्च पासून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. हा लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत चालणार आहे. मात्र देशभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाने 'महाराष्ट्रात 21 दिवसांच्या नंतरही लॉकडाऊन वाढवायला हवा का?' यावर पोल घेऊन वाचकांनी मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या पोलला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एबीपी माझाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घेतलेल्या या पोलमध्ये लॉकडाऊन वाढवला जावा अशी अपेक्षा सर्वाधिक लोकांनी व्यक्त केली आहे.
काय सांगताहेत एबीपी माझाचे पोल
ट्विटरवर घेतलेल्या या पोलमध्ये 79 टक्के युझर्सनी लॉकडाऊन वाढवावा असं म्हटलं आहे. तर 21 टक्के लोकांनी लॉकडाऊन वाढवायला नको असं म्हटलं आहे. फेसबुक अकाऊंटवरून घेतलेल्या पोलमध्ये 79 लोकांनी पोल वाढवावा असं म्हटलं आहे. तर युट्युबवर घेतलेल्या पोलमध्ये तब्बल 81 टक्के लोकांनी लॉकडाऊन वाढवायला हवं असं म्हटलं आहे तर केवळ 19 टक्के लोकांनी लॉकडाऊन वाढवायला नकार दिला आहे. तर एबीपी माझाच्या इन्स्टाग्रामवर घेतलेल्या पोलमध्ये 67 टक्के लोकांनी 21 दिवसानंतर लॉकडाऊन वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
राज्यात लॉकडाऊन वाढवावा, लोकांना काय वाटतं?